पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काळेवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. नगरसेवक विनोद नढे यांनी एका प्रकरणातील आरोपी व्यक्ती साक्षीदार म्हणून फिरत असल्याचा आरोप करत संबंधित पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“ज्या व्यक्तीवर गुन्ह्याचे आरोप आहेत, तीच व्यक्ती साक्षीदार म्हणून फिरत असेल तर कायद्यावरील विश्वास डळमळीत होतो,” असे सांगत नढे यांनी संबंधित PI (पोलीस निरीक्षक) यांची सखोल चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली.
या मुद्द्यावर सभागृहात काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित विषयांमध्ये पोलिसांनी निष्पक्षपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या आरोपांमुळे काळेवाडी पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

