पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित ₹६० कोटी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तात्काळ गुन्हा (FIR) दाखल करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी दक्ष नागरिक संघाचे अध्यक्ष ॲड. अजित बोराडे यांनी केली आहे. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत केवळ अंतर्गत चौकशी ही जनतेची दिशाभूल असल्याचे म्हटले.
ॲड. बोराडे यांनी सांगितले की, स्थायी समिती व महासभेत बनावट ठराव मंजूर करून त्याच्या आधारे कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. प्राथमिक चौकशी अहवालात अशा किमान १४ बनावट ठरावांची नोंद समोर आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी महापालिका आयुक्तांना नोटीस देण्यात आली असून प्रशासनाला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
“FIR नोंद झाल्याशिवाय पोलीस तपास, पंचनामा, कागदपत्रांची तपासणी आणि फॉरेन्सिक प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे अंतर्गत चौकशी हा केवळ वेळकाढूपणा असून पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींना संधी देण्याचा प्रकार आहे,” असा आरोप ॲड. बोराडे यांनी केला.
नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी निधीअभावी अडचणी असल्याचे सांगितले जाते, मात्र दुसरीकडे ₹६० कोटींच्या कथित अपहारासारखे प्रकार समोर येत असल्याने हा जनतेच्या पैशांचा गंभीर गैरवापर असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी काही थेट प्रश्न उपस्थित केले —
पीसीएमसी नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?
FIR दाखल न करण्यासाठी कोणाचा दबाव आहे?
या प्रकरणातील संपूर्ण सत्य जनतेसमोर का आणले जात नाही?
दक्ष नागरिक संघाने या प्रकरणात स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून, मुदतीत FIR दाखल न झाल्यास ॲड. अजित बोराडे स्वतः न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल करून पुढील कायदेशीर लढा उभारतील, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

