पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त एसटी महामंडळ प्रवाशांसाठी “एसटी संगे तीर्थाटन” ही विशेष योजना घेऊन आले आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांनी आपल्या गावातील किमान ४०जणांचा ग्रुप तयार करून देशभरातील कोणत्याही तीर्थक्षेत्रकिंवा पर्यटन स्थळी एसटी बसने प्रवास करता येणार आहे. या योजनेत महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना ५०टक्के सवलत तर अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे मोफतप्रवास देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेतएसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक फायदाहोणार आहे. सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वल्लभ नगर आगारप्रमुख पल्लवी पाटील यांनी केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना आगार प्रमुख पल्लवी पाटील यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी नाळ जोडून, त्याच्या श्रद्धेला सुरक्षिततेची आणि परवडणाऱ्या शुल्कात राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक लोकाभिमुख योजना साकारली आहे.
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात येणारी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ योजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक न्याय यांचा सुरेख संगम आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. तसेच ही योजना ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित असून, सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल, अशा शुल्कात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देण्याचा तिचा मुख्य उद्देश आहे, असे ते म्हणाले.
राज्य शासनाने एसटी प्रवासासाठी विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सर्व सवलती या योजनेत जशाच्या तशा लागू राहणार आहेत. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मूळ तिकिटावर ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक आगार कार्यक्षेत्रातून ४० प्रवाशांचा गट तयार करून, त्यांच्या सामाजिक सवलतीच्या तिकीट दरात सहली आयोजित केल्या जाणार आहेत. या सहलींसाठी एसटीच्या नव्या, सुरक्षित आणि आरामदायी बस उपलब्ध करण्यात येणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.
ही योजना २३ जानेवारी २०२६ पासून राज्यातील २५१ आगारांत एकाच वेळी राबविण्यात येईल. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान ५ बस या योजनेसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याने, राज्यभरात एका दिवशी सुमारे १,००० ते १,२५० धार्मिक व पर्यटन विशेष बसगाड्या धावणार आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला एक नवे बळ मिळणार आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, ११ मारुती दर्शन, पंढरपूर – अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर – पन्हाळा – जोतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी आदी विविध ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक वैभवाचा अनुभव घेण्याची ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
‘स्वस्त आणि सुरक्षित पर्यटन’ ही केवळ संकल्पना न राहता प्रत्यक्षात उतरवणारी ही योजना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वसामान्यांवरील प्रेमाची आणि विचारांचीच पुढची पायरी आहे.

