पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )– पुण्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विधानसभेत ठामपणे आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार हेमंत रासने यांनी दिले.
भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने शनिवार पेठेतील विश्वकर्मा भवन येथे आयोजित कार्यक्रमात आमदार रासने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी कामगार क्षेत्रातील विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला.
महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली. तसेच कायम सफाई कामगारांच्या घरकुल व मालकी हक्काच्या प्रश्नांवर विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवल्याबद्दल आमदार रासने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
बैठकीत बीडी कामगारांसाठी किमान वेतनाची अंमलबजावणी, त्यांच्यासाठी घरकुल योजना, तसेच पुणे मेट्रोतील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी आणि केंद्रीय वेतन दरानुसार वेतन मिळण्यासाठी प्रशासन व कामगार मंत्रालयासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असेही रासने यांनी स्पष्ट केले.
कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव सागर पवार, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

