पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर (गावठाण) येथील महापालिका दवाखान्यास ‘माता रमाई आंबेडकर’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक नागरिकांसाठी हा दवाखाना अत्यंत महत्त्वाचा आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू असून, त्याला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे नाव देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माता रमाई आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साथ देत समाजकारणात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या त्याग, संयम आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्या आजही प्रेरणास्थान मानल्या जातात.
या दवाखान्यास त्यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा सन्मान होईल, तसेच परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव आणि प्रेरणा निर्माण होईल, असेही निवेदनात म्हटले आहे. संबंधित मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नाना काटे यांनी व्यक्त केली आहे.

