यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात गुरुवारी (दि. १२) त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचणाऱ्या या महान नेतृत्वाच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.
पीएमआरडीएच्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना आवले-डंबे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या औद्योगिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी केलेली वैचारिक पायाभरणी आणि घालून दिलेली प्रशासकीय शिस्त आजही आपल्याला मार्गदर्शक ठरत आहे.”
या कार्यक्रमाला ‘पीएमआरडीए’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यामध्ये उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे, सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, विकास परवानगी विभागाच्या उपसंचालक स्मिता कलकुट्टी आणि तहसीलदार अभिजित जगताप यांचा प्रामुख्याने समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या प्रगतीचा गौरव केला. सहकार चळवळ, पंचायत राज आणि औद्योगिक विकासाच्या माध्यमातून त्यांनी राज्याला दिलेली दिशा आजही तितकीच प्रासंगिक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रशासनातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी त्यांना पुष्पांजली अर्पण केली.

