पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाने कॉपिमुक्त अभियानांतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले आहेत. या नियमानुसार प्रत्येक वर्गात कॅमेरा असणे सक्तीचे केल्यामुळे शहरातील 90 टक्के केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे.
राज्य मंडळामार्फत 2025-26 साठी बारावीची परीक्षा 10 तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान किती परीक्षा केंद्रांवरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यन्वित आहे, याची चाचपणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत सुरू केली आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा उपलब्ध असेल, त्या केंद्रांनाच मान्यता दिली जाणार आहे. याबाबत यंदा मंडळामार्फत परीक्षा केंद्रावरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्हीची सुविधा आहे की, नाही यावर अधिक भर दिला जात आहे.
राज्य मंडळामार्फत इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य मंडळ व अनेक राज्य व विभागीय शिक्षक, मुख्याध्यापक संघटना पदाधिकारी यांच्या सहविचार सभा राज्य मंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी सरसकट सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या केंद्रावर सीसीटीव्ही उपलब्ध होणार नाहीत, अशा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळण्याची विनंती केली आहे.

