पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठे राजकीय बळ मिळाले आहे. राष्ट्रीय मराठा पार्टीने अधिकृतपणे भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला असून, यामुळे शहरातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होताना दिसत आहेत.
राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील (होनाळीकर) यांनी दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे हा निर्णय जाहीर केला. या पत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना राष्ट्रीय मराठा पार्टीचा पाठिंबा देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पाठिंब्याची घोषणा करताना राज्यातील व शहरातील अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती आणि भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रमुख आमदार श्री. शंकरराव जगताप, शहर भाजप जिल्हाध्यक्ष श्री. शत्रुघ्न सिताराम काटे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय मराठा पार्टीने या पत्रातून पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांना भाजपच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सक्षम व स्थिर नेतृत्व देऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत हा पाठिंबा देण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपची ताकद वाढली असून, विरोधकांच्या रणनीतींवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात राष्ट्रीय मराठा पार्टीच्या या भूमिकेमुळे भाजपची बाजू अधिक मजबूत झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

