पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय फोडाफोडीत आता भाजपला पिंपरीत मोठा धक्का बसला आहे. पिंपरीगावातील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश करत मनगटावर ‘घड्याळ’ बांधले. भाजपमध्ये त्यांचे कट्टर राजकीय विरोधक संजोग वाघेरे यांनी प्रवेश केल्यानंतर संदीप वाघेरे अस्वस्थ होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात घेत आक्रमक राजकीय खेळी केली होती. त्याला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर थेट पलटवार सुरू केला आहे. संदीप वाघेरे यांच्या प्रवेशामुळे पिंपरीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा दावा करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात सध्या माजी नगरसेवकांची जोरदार फोडाफोडी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे शहरप्रमुख, राष्ट्रवादीचे दोन माजी उपमहापौर, तीन माजी स्थायी समिती अध्यक्षांसह तब्बल १७ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले व अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला. संजोग वाघेरे आणि संदीप वाघेरे हे पिंपरीगावातील कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. संजोग वाघेरे व त्यांच्या पत्नी, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने संदीप वाघेरे नाराज झाले होते. “आम्हाला विश्वासात न घेता विरोधकांना पक्षात घेतले गेले. आम्ही दोघे एका पक्षात राहू शकत नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती.
कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगणाऱ्या संदीप वाघेरे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करत भाजपला स्पष्ट संदेश दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगाव (अशोक थिएटर, वैष्णवीदेवी मंदिर, मासूळकर पार्क, जिजामाता हॉस्पिटल, मिलिंदनगर परिसर) येथून संदीप वाघेरे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल अधिक मजबूत होईल, असा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील माजी उपमहापौर, माजी विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता संदीप वाघेरे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय रणधुमाळी आणखी तीव्र होणार, हे निश्चित मानले जात आहे.

















