पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमध्ये नोव्हेंबर महिन्याचे रेशन धान्य तब्बल वीस दिवस उशिरा पोहोचले. त्यातही नागरिकांना मिळणारी ज्वारी निकृष्ट, बुरशीदार आणि पावडरसारखी असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक दुकानांत आलेल्या ज्वारीत सोनकिडे, बुरशी तसेच हाताने शिवलेल्या पोत्यांची पॅकिंग दिसत असल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
सामाजिक संघटनांनी “निकृष्ट धान्य खरेदीस कोण जबाबदार?” असा सवाल उपस्थित केला आहे.
दुकानदारांवर दुहेरी संकट
उशिरा आलेले धान्य आणि त्यातही खराब ज्वारी यामुळे रेशन दुकानदार अडचणीत आले आहेत. लाभार्थ्यांनी थेट दुकानदारांकडे नाराजी व्यक्त केल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले.
भोसरी (फ) विभागात धान्य सर्वाधिक उशिरा पोहोचल्याचे समजते. शहरातील तिन्ही पुरवठा विभागांत मिळून ४,९३,८७३ लाभार्थी आहेत, ज्यांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा फटका बसत आहे.
रेशनची मात्रा (नोव्हेंबरपासून नवीन)
प्राधान्य कुटुंब: गहू १ किलो, ज्वारी १ किलो, तांदूळ ३ किलो
अंत्योदय कुटुंब: गहू ५ किलो, ज्वारी ५ किलो, तांदूळ २५ किलो
गर्दीचा ताण वाढला
महिन्याच्या समाप्तीला अवघे दहा दिवस शिल्लक असताना रेशन दुकानांवर मोठी गर्दी वाढली आहे. उपलब्ध असलेल्या ४८८ टन ज्वारीपैकी काही मोठा हिस्सा अत्यंत निकृष्ट असल्याने वाटपात गोंधळ निर्माण झाला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांची टीका
“नागरिकांना अशा निकृष्ट दर्जाचे धान्य देणे म्हणजे शासनाची लाज वाटावी अशी बाब आहे. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. तातडीने तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी.”
— पोपट आरणे, सामाजिक कार्यकर्ते, घरकुल वसाहत
पुरवठा विभागाची प्रतिक्रिया
“ज्वारीच्या प्रतीची तपासणी करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना खराब ज्वारी मिळाल्यास दुकानदारांकडे त्याऐवजी गहू मागण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
— प्रशांत खताळ, पुरवठा अधिकारी, पुणे

