सत्तेची आणि पैश्याची मस्ती चढलेल्या सत्ताधाऱ्यांचा माज शिवसैनिक मोडणार – माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील महाड- पोलादपूर-माणगाववासीयांचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्तेचा आणि पैश्याची मस्ती चढलेली आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाड-पोलादपूर-माणगावची सुजाण जनता आणि सर्वसामान्य कट्टर शिवसैनिक त्यांचा माज उतरविल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांत महाड नगरपरिषेदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांनी घणाघात केला.
महाड-पोलादपूर-माणगाव तालुक्यातील पिंपरी चिंचवड शहरवासियांचा स्नेहमेळावा काळेवाडी येथील आरंभ बँकेट हॉल याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात महाड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमदार भरत गोगावले म्हणतात की मी राजकारणात नवखी आहे. परंतु महाड नगरपरिषेदेत नगराध्यक्षा म्हणून काम करीत असताना नगरपरिषेदेची सुमारे १५ कोटींची इमारत कोणत्याही शासकीय मदतीशिवाय बांधली. तसेच सुमारे ३०० कोटी रुपयांची विकासकामे असोत, नागरिकांसाठी एक लाख रुपयांचा विमा असो की स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाड शहराला मिळवून दिलेले पारितोषिक असो माझे कामच माझी कर्तबगारी सिद्ध करण्यास पुरेशी आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
महाड-पोलादपूर मतदारसंघातील रुग्णालयातील सुविधांचा अभाव, एमआयडीसीतील कामगारांची होणारी कुचंबना, बेरोजगारीची गंभीर समस्या, कंत्राटदारांची होणारी ससेहोलपट, एसटी डेपोची झालेली वाताहत यामुळे गेल्या १५ वर्षांपासून आमदार असलेले गोगावले नेमकं कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जाणार. त्यामुळेच गावोगावी मतदारांना मिक्सर, महिलांना साड्या आणि पैसे वाटत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची टीका, जगताप यांनी यावेळी केली.
या मेळाव्यास शिवसेना सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शिवसेना प्रवक्ते अनिश गाढवे, शिवसेना महिला आघाडीच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, योगेश बाबर, नाना जगताप, धनंजय देशमुख, पद्माकर मोरे, अनिल मालुसरे, दिलीप भागवत, सुरेंद्र चव्हाण, स्वाती ढमाले, संतोष सौंदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच चंद्रकांत धनावडे, गोविंद झांजे, मच्छिंद्र देशमुख, राजेंद्र पालांडे, बाळाराम कदम, सुहास कदम, विलास महाडिक, संजय दळवी, दीपक शिंदे, प्रकाश रिकामे, शंकर खेडेकर, दिलीप मोरे, प्रभाकर निकम, सुरेश निकम, नयन पालांडे, राजू जाधव, भरत शिंदे आदींनी केले.















