ताज्या घडामोडीपिंपरी

पहिल्याच प्रयत्नात राज्यात अव्वल! तरुण वकील राज नलगे झाले सर्वात कमी वयाचे जिल्हा न्यायाधीश”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “क्लार्क पासून न्यायाधीश” हा विलक्षण प्रवास फक्त ऐकण्यास प्रेरणादायी नाही, तर संघर्षासमोर डगमगणाऱ्यांसाठी एक जिवंत उदाहरण ठरावा अशी कहाणी आहे अॅडव्होकेट राज नलगे यांची. मुंबई उच्च न्यायालयामार्फत घेण्यात आलेल्या न्यायाधीश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात सर्वाधिक गुण मिळवत ‘प्रथम क्रमांक’ पटकावण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी वयात जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड होणारे ते पहिलेच तरुण वकील ठरले आहेत.

नलगे यांचा प्रवास संघर्षमय. आर्थिक संकटातही शिक्षणाची सांगड घालत त्यांनी वकिलाच्या क्लार्क म्हणून सुरू केलेले करिअर हळूहळू पुढे सरकवत न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च मार्गावर झेप घेतली. “संघर्षासमोर यश नतमस्तक होते” हे त्यांचे जीवनसूत्र जणू वास्तवात उतरले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे सोशल फाउंडेशन, कै. हिराबाई किसनराव लांडगे मोफत कायदा सल्ला केंद्र, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा व कायदा आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, प्रदेश उपाध्यक्ष (कायदा आघाडी) अॅड. विशाल डोंगरे, मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे, तसेच विविध पक्ष-आघाड्यांचे पदाधिकारी, कायदा व्यवसायातील मान्यवर आणि विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नलगे यांचा सत्कार करत सर्वांनी त्यांच्या पुढील न्यायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

निश्चय, परिश्रम आणि चिकाटी यांचा अतूट संगम असलेल्या या प्रवासाने पिंपरी-चिंचवडचा मान वाढवला असून, तरुणांसाठी एक प्रेरणादायी ‘यशपाथ’ तयार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button