शिवसेना एकनाथ शिंदेंचीच – राहुल नार्वेकर

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडले. सेनेत २ गट पडल्याचं २२ जूनला निदर्शनास आले. पक्षात पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारणी महत्त्वाची असते. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाही. कार्यकारणी ही पक्षात सर्वोच्च असते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार बहुमताला आहे. त्यामुळे केवळ ठाकरे किंवा शिंदे यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदेंकडे बहुमत असल्यानं शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो. भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला आहे.
विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करण्यात आले. यावेळी ठाकरे-शिंदे या दोन्ही गटाचे आमदार उपस्थित होते. हे निकालपत्र १२०० पानांचे असले तरी त्यातील ठळक मुद्दे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात वाचून दाखवले. निकालाची सुरुवात करण्याआधी नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. त्याचसोबत सुनावणीवेळी सहकार्य केल्याबद्दल दोन्ही गटाच्या वकिलांचे आभार मानले. या प्रकरणाची सुनावणी घेताना माझ्यासमोर खरी शिवसेना कुणाची आणि व्हिप कुणाचा हा मुद्दा होता. घटना, नेतृत्व आण विधिमंडळ पक्ष हे तीन घटक महत्त्वाचे होते. माझ्यासमोर दोन्ही गटाने पुरावे सादर केले. शिवसेनेच्या पक्ष घटनेचाही विचार निकषात केला गेला आहे. निकाल देताना शिवसेनेची २०१८ ची घटना लक्षात घेतली. विधिमंडळातील बहुमतदेखील ग्राह्य धरले गेले. दोन्ही गटात पक्षप्रमुखपदावरून मतभेद आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कोणता हे प्रथमदर्शनी ठरवले गेले. पक्ष कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय विचारात घेतला गेला.









