ताज्या घडामोडीपुणेशिक्षण

लोकल तंत्रज्ञान ग्लोबल व्हावे – पद्मश्री डाॅ.प्रल्हाद रामराव

Spread the love

 

‘एमआयटी एडीटी’त सहाव्या राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ
पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – भारतातील तंत्रज्ञानाने सध्या जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान सारख्या अंतराळ मोहीमा, जगातील सर्वांत मजबूत मिसाईल, विविध प्रकारचे ट्रोन्स बनवून आपल्या शास्त्रज्ञांनी जगाचे लक्ष आकर्षित केले आहे. भारत आता सॉफ्टवेअरसह हार्डवेअर क्षेत्रातही स्वावलंबी बनला आहे. त्यामुळे या स्पर्धात्मक युगात आपल्याकडील लोकल तंत्रज्ञानाला प्रचंड मागणी मिळत असल्याने ते ग्लोबल व्हायला हवे, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे(डीआरडीओ) माजी संचालक व एस-व्यासा विद्यापीठ बंगळुरूचे प्र.कुलगुरू पद्मश्री डाॅ.प्रल्हाद रामराव यांनी मांडले.        
ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात ‘इनोव्हेटिव्ह ग्लोबल टेक्नॉलॉजी ट्रेंड्स’ या विषयावर आधारीत सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. याप्रसंगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डाॅ.पराग काळकर, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहीत दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.विरेंद्र भोजवानी आदी उपस्थित होते.
डाॅ.रामराव पुढे म्हणाले की, भारतात सध्या अणुऊर्जेवर मोठ्या स्थरावर संशोधन चालू आहे. अणू उर्जेचा सकारात्मक वापर करून अगदी तालुका स्तरावर ऊर्जा निर्मितीतून गावांच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्याचे उद्दिष्ट आता शास्त्रज्ञांचे, असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
प्रा.डाॅ.काळकर यांनी याप्रसंगी आपल्या भाषणातून टेक जायंट्स, एआय, मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचे फायदे व तोट्यांबद्दल मत व्यक्त केले. तसेच त्यांनी मेक इन इंडिया सारख्या भारत सरकारच्या योजनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजल्याचेही स्पष्ट केले.
यावेळी बोलताना प्रा.डाॅ.सुनीता कराड म्हणाल्या, एमआयटी एडीटी विद्यापीठ दरवर्षी ही राष्ट्रीय परिषद आयोजित करते. यंदा या परिषदेचे सहावे वर्ष असून त्यामाध्यमातून आत्तापर्यंत ६०+ स्टार्टअप्स व २००० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. यंदा २० हून अधिक विषय घेवून विद्यापीठात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला पुढील तीन दिवस ही परिषद पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.सुनीता कराड यांनी तर आभार डाॅ.रामचंद्र पुजेरी यांनी मानले. तर डाॅ.स्नेहा वाघटकर व डाॅ.स्वप्निल शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदान द्वारा कार्यक्रमाची सांगता झाली.

चौकट
तंत्रज्ञानाच्या धोक्यांपासून सावध रहा-प्रा.डाॅ.कराड

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.डाॅ. मंगेश कराड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी विकसित भारत@2047 संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेत संशोधकांचा सर्वांत मोठा हातभार लागणार आहे. भारतातील युपीआय, आधार सारख्या योजना आता फ्रान्ससारख्या देशाने स्विकारल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस एआय सारख्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करत असताना त्यातील डिफेक सारख्या धोक्यांपासून आपण सावध रहायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button