Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढती पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता रहाटणी प्रभागात पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या आणि विद्युत खांब उभारण्याच्या कामास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे. तसेच १२ मीटर डीपी रोडवर अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ड्रेनेज लाईनचे कामही चालू करण्यात आले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते देविदास तांबे यांनी यासंदर्भात महापालिकेच्या जनसंवाद सभेत सातत्याने मागणी केली होती. अखेर आमदार शंकर जगताप यांच्या सहकार्याने त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

रहाटणी प्रभागातील गणेश कॉलनी, शिवधाम कॉलनी, कारगिल कॉलनी, शिवलीला कॉलनी आदी भागांमध्ये अद्यापही पाण्याची पाईपलाईन, तसेच विजेचे विद्युत खांब आदी मूलभूत सुविधा महापालिकेच्या वतीने पुरविण्यात आल्या नव्हत्या. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याबाबत देविदास तांबे यांची भेट घेत सदर समस्या मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.
नागरिकांच्या मागणीची तातडीने दखल घेत तांबे यांनी महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या जनसंवाद सभेत हा विषय लावून धरत प्रशासनाला धारेवर धरले. तसेच यासंदर्भात आमदार शंकर जगताप यांच्याकडेही पाठपुरावा केला.
अखेर महापालिका प्रशासनाने तांबे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन १२ मीटर डीपी रोडवर ड्रेनेज लाईनचे काम तसेच प्रभागात पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे व विद्युत खांब उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे रहिवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात लवकरच अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांचे रखडलेले डांबरीकरणचे कामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देविदास तांबे यांनी यावेळी दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version