Spread the love

 

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध लष्कर, सुसंघटित प्रशासन, सुनियोजन, वेळेचे व्यवस्थापन, गनिमी कावा, भूभागाची इत्थंभूत माहिती, लक्षवेधी वेगवान हालचाली यांच्या बळावर बलाढ्य अन्यायी राजवटींना शह देऊन मानवतावादाची बीजे रोवली असे प्रतिपादन प्रा. अतुल पोखरकर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, किल्ल्यांची उभारणी, पुनर्बांधणी, दऱ्या-खोऱ्यातील मावळ्यांना एकत्र करण्याची हातोटी, शेतकऱ्यांना न्याय, सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सामिलकीचा वसा जपत आदर्श स्वराज्य शिवरायांनी स्थापन केले. एक आदर्श मित्र, आदर्श पिता, आदर्श पुत्र अशा विविध नात्यांनी सकलगुणावमंडित ठरले. जगात एक आदर्श राजा म्हणून अढळ स्थान प्राप्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे होते. छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या जीवन व कार्याचे अनुसरण तरुणांनी करावे. शिवरायांनी निर्माण केलेल्या गड-किल्यांचे संवर्धन समाजातील सर्वच घटकांनी करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच छत्रपती शिवरायांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुणांनी पुढे यावे  असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. .      कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. भाऊसाहेब सांगळे यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य डॉ. दत्तात्रय हिंगणे, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे  आभार डॉ. संदीप नन्नावरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी यांनी केले. शिवजयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन, शिवकालीन नाणी प्रदर्शन,पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले, तसेच शिववंदना घेण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version