ताज्या घडामोडीपिंपरी

चिखलीत २०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र उभारणार! – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Spread the love

– आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत कार्यवाहीबाबत बैठक

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी. आगामी काळात होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या दालनामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार लांडगे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली.

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये वाढलेली लोकसंख्या आणि पाण्याची गरज याचा विचार करता भामा आसखेड प्रकल्पांतर्गत चिखली येथे प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम त्वरीत हाती घ्यावे, अशी सूचना आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. चिखली, तळवडे, मोशी, चऱ्होली, दिघी, डुडूळगाव, जाधववाडी आदी गावांचा समावेश महापालिका हद्दीत झाला. मात्र २०१७ पर्यंत या गावांना पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे, असे आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावर आयुक्त शेखर सिंह यांनी सदर कामाबाबत प्रशासनाकडून सकारात्मक भूमिकेतून कार्यवाही करण्यात येईल, असे आवश्वासन दिले आहे.
**

पाणी पुरवठा सक्षमीकरण काळाची गरज : आमदार लांडगे
वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात पाणी पुरवठा सक्षम करणे काळाची गरज असून, त्यासाठी भाजपा सत्ताकाळात आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी आरक्षित करण्यात आले. त्यापैकी १०० एमएलडी पाणी शहरात दाखल झाले आहे. परिणामी, शहरातील पाणी पुरवठा सुलभ होण्यास मदत होत आहे. शहरातील आगामी ४० वर्षांतील वाढत्या नागरिकरणाचा विचार करुन भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. आगामी दीड-दोन वर्षांमध्ये पाणी शहरात दाखल होईल. त्यासाठी चिखली येथे २०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून, निविदा प्रक्रिया राबवावी आणि कामाला गती द्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi