ताज्या घडामोडीपिंपरी
उर्दू गजलांच्या प्रेमात रंगले रसिक

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वरा म्युझिकल आयोजित आणि साज पुणे प्रस्तुत ‘ये इश्क नहीं आसां’ या गजल गायन मैफिलीत लोकप्रिय शायरांच्या गजल पारंपरिक पध्दतीने सादर झाल्या. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह) येथे गुरुवार, दिनांक ०४ जुलै २०२४ रोजी सादर करण्यात आलेल्या उर्दू गजलांच्या मैफलीतील शृंगाररसात रसिक रंगून गेले. डॉ. शशिकला शिरगोपीकर, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर आणि गायत्री सप्रे – ढवळे या गायक कलाकारांनी अभिजात शास्त्रीय संगीतातील रागांवर आधारित या उर्दू गजलांचे सुरेल सादरीकरण करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. “रंज की जब गुफ्तुगू होने लगी…” (दाग दहेलवी), “कभी कहा ना किसीसे तेरे फसाने की…” (कमर जलालाबादी), “छुपाऊ लाख राज – ए – इश्क…” (शमीम जयपुरी), “कू – ब – कू फैल गयी बात…” (परवीन शाकिर), “कही चांद राहों में… (बशीर बद्र), “इक लफ्ज – ए – मोहब्बत का… (जिगर मुरादाबादी), “कभी मुझको साथ लेकर…” (अहसान दानिश), “वो जो हम में तुम में करार था…” (मोमिन), “मिलना था इत्तेफाक…” (अंजुम रहबर), “काम आ सकी ना अपनी वफाए …” (अख्तर शिरानी) अशा एकाहून एक सरस गजलांमधून प्रेमिकांमधील ओढ, प्रेमाचे संकेत, प्रतीक्षा, मिलन, विरह, ताटातूट अशा संमिश्र भावभावनांची उत्कट अनुभूती श्रोत्यांना मिळाली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीचा समारोप “दिल लगाने की किसीसे वो सजा पायी की बस…” या शमीम जयपुरी यांच्या रसिकप्रिय गजलेने करण्यात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या मैफलीचा श्रवणानंद घेतला. अरुण गवई आणि डॉ. सतीश गोरे यांनी तबला आणि गिटारची नेटकी साथसंगत केली; तर स्नेहल दामले यांनी खुमासदार निवेदनाने श्रोत्यांची दाद मिळवली.













