ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचयविषयी केलेल्या धमकीवजा विधानाचा युवक काँग्रेसकडून तीव्र निषेध
युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड तहसीलदारांना निवेदन

कीर्तनकार संग्राम भंडारेंवर कडक कारवाई करण्याची प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी ज्येष्ठ नेते आणि स्वच्छ प्रतिमेचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात केलेल्या धमकीवजा आणि भडक विधानाचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शाखेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या विधानात नाथुराम गोडसेसारख्या खुनी व्यक्तीचा उल्लेख करून त्याचे अप्रत्यक्ष उदात्तीकरण करण्यात आले असून, ही बाब लोकशाहीच्या मूल्यांवर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरेवर घातक हल्ला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस वसीम शेख, विक्रांत सानप, तसेच पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतीक जगताप उपस्थित होते.
जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाळासाहेब थोरात हे शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेले नेते असून, त्यांच्याविरोधातील हे अमानुष विधान म्हणजे महाराष्ट्राच्या लोकशाही मूल्यांचा अपमान आहे. संतपरंपरेचा वारसा सांगणाऱ्या कीर्तनकाराकडून समाजात द्वेष आणि हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदर निवेदनात संग्राम भंडारेवर सामाजिक तेढ, द्वेषयुक्त वक्तव्य आणि धमकीच्या आरोपाखाली तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, सार्वजनिक मंचांचा वापर धार्मिक मुखवट्याखाली विष पसरवण्यासाठी होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात आणि कीर्तनकारांनी सामाजिक सौहार्द, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करावे, यासाठी प्रबोधन करावे या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
चंद्रशेखर जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, ही लढाई केवळ एका नेत्याच्या सन्मानाची नाही, तर महाराष्ट्राच्या लोकशाही, सहिष्णुता आणि सामाजिक सलोख्याच्या परंपरेची आहे. “आम्ही बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असेही त्यांनी नमूद केले.














