वाकड येथे पर्यावरणपूरक विसर्जन घाटाची निर्मिती – युवा नेते विशाल वाकडकर यांचा उपक्रम

वाकड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश देण्यासाठी वाकड येथे द्रौपदा लॉन्समध्ये पर्यावरणपूरक विसर्जन घाटाची निर्मिती करण्यात आली आहे. युवा नेते विशाल वाकडकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा घाट उभारण्यात आला असून, नागरिकांनी व गणेश मंडळांनी या घाटाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरण रक्षणाचा संदेश
गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) गणेश मूर्तींचे प्रमाण वाढले आहे. या मूर्तींचे विसर्जन थेट नदी, नाले, ओढे, विहिरीत केल्यामुळे जलप्रदूषणात वाढ होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रदूषणमुक्त विसर्जनाची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी वाकडमध्ये हा घाट उभारण्यात आला आहे.
विशाल वाकडकर म्हणाले, “गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर तसेच POP मूर्तींमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करते. समाजातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक विसर्जनाची निवड करून पर्यावरण संवर्धनात पुढाकार घ्यावा, ही काळाची गरज आहे.”
या पर्यावरणपूरक विसर्जन घाटावर खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:
पाच फुटांपर्यंतच्या शाडू माती व POP मूर्ती विसर्जनाची सोय. मूर्तीदान केंद्र – विसर्जन न करता मूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था. निर्माल्यकुंड – निर्माल्य वेगळे जमा करण्यासाठी विशेष कुंड. स्वच्छता व्यवस्था – परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती.
पर्यावरण जनजागृती – नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शन
सर्व नागरिकांनी खालील नियम पाळावेत असे आवाहन आयोजकांनी केले आहे: या विसर्जन घाटावर विसर्जित करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचे श्री फाउंडेशन या संस्थेमार्फत संकलन करून, मूर्तींचे रंगरंगोटी करण्यात येते आणि आणि त्या मूर्ती पुढील वर्षी अर्ध्या किंमतीत वितरीत केल्या जातात. आणि येणाऱ्या निधीतून अनाथ मुलांच्या संगोपन आणि शैक्षणिक साहित्यासाठी मदत केली जाते. याप्रकारे प्रत्येकाच्या हातातूनही समाजकार्य घडून येते.
विसर्जन घाटावर गुलाल, रंग व रासायनिक पदार्थांचा वापर टाळावा. प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंदीस्त. निर्माल्य फक्त निर्माल्यकुंडातच टाकावे. पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे.
हा पर्यावरणपूरक विसर्जन घाट २७ ऑगस्ट २०२५ पासून ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे.“पर्यावरणाचे संवर्धन आणि गणेश भक्तांचा उत्साह यामध्ये संतुलन राखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा आदर्श घालून द्यावा,” असे आवाहन युवा नेते विशाल वाकडकर यांनी केले आहे.















