वैद्यकीय साहित्य खरेदीत गैरप्रकाराची चौकशी करा – राहुल कोल्हटकर यांची आयुक्तांकडे मागणी”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग व यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकीय भांडार विभागामार्फत खरेदी करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्याच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात भाजपचे शहर प्रवक्ते राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.
कोल्हटकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, खरेदी करण्यात आलेल्या साहित्यामध्ये दर्जाशी संबंधित मोठ्या प्रमाणात तडजोड करण्यात आली असून, निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठादारांकडून खरेदी करण्यात आले आहे. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यात आला आहे.
या सगळ्या प्रक्रियेची सखोल चौकशी करून संबंधित तांत्रिक दक्षता समितीला नव्याने आलेल्या साहित्याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, यापुढे कोणतेही साहित्य खरेदी करताना प्रि-बिड अमेंडमेंट अहवालाच्या निकषांनुसारच निविदा प्रक्रिया राबवली जावी आणि यासाठी सर्व विभागांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.
महापालिकेच्या खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्तबद्ध कारभार सुनिश्चित करण्यासाठी ही चौकशी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.













