महावितरणमध्ये कंत्राटी कामगारांना रोजगार देण्याआधीच जबरदस्तीने राजीनामे व हमीपत्र घेण्याचा प्रकार; संघटनांचा तीव्र विरोध

महावितरणमध्ये कंत्राटी कामगारांना रोजगार देण्याआधीच जबरदस्तीने राजीनामे व हमीपत्र घेण्याचा प्रकार; संघटनांचा तीव्र विरोध
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरणमध्ये कंत्राटी कामगारांच्या भरतीसंदर्भात बेकायदेशीर व अन्यायकारक अटी लागू केल्याचा आरोप भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांच्याकडून करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक सबस्टेशनमध्ये हजारो कंत्राटी कामगार भरती करण्यासाठी महावितरण कंपनीने स्मार्ट सर्विसेस व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस या दोन कंपन्यांना कंत्राट दिले आहे. मात्र, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसकडून कामगारांना प्रत्यक्ष रोजगार देण्याआधीच खालील बाबी जबरदस्तीने स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले आहे:
राजीनामा पत्र भरून देणे
₹100 च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून देणे
विशिष्ट राजकीय संघटनेचे सक्तीचे सभासदत्व घेणे
वेतनातून बेकायदेशीर कपातीस मान्यता देणारे पत्र देणे
हे सर्व प्रकार श्रम कायदे व कामगारांच्या मूलभूत अधिकारांचा स्पष्ट उल्लंघन करत असून, कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या प्रकरणात तातडीने चौकशी व्हावी, यापूर्वी कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना पुन्हा त्या-त्या सबस्टेशनमध्ये रोजगार मिळावा, व त्यांच्या नावाची नोंद संपर्क पोर्टलवर व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महावितरणचे संचालक (मानव संसाधन) मा. राजेंद्र पवार यांना पत्र देण्यात आले असून, लवकरच संघटनेशी बैठक होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.
“संघटना कोणत्याही अधिकृत एजन्सीसोबत सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र कायद्याचे उल्लंघन झाल्यास संघटना आंदोलनात्मक व कायदेशीर मार्गाने कामगारांना न्याय मिळवून देईल,” असे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी स्पष्ट केले.













