Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – किवळे येथील माई बालभवन संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अंध व अनाथ मुला-मुलींच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी घेत त्यांना शिक्षण, रोजगार तसेच विवाह व्यवस्थेच्या माध्यमातून स्वावलंबी जीवनाची दिशा देत आहे. या संस्थेमार्फत अंध अनाथ मुला-मुलींचे केवळ बालपणच नव्हे, तर त्यांचे भविष्यातील आयुष्य सुरक्षित व सन्मानपूर्वक घडावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

माई बालभवन संस्थेच्या वतीने नुकताच किवळे येथे दोन अंध निराधार मुलींचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी विविध स्वरूपाचा खर्च अपेक्षित असल्याने संस्थेने सामाजिक जाणिवेतून कार्य करणाऱ्या ‘वुई टुगेदर फाउंडेशन’कडे मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सर्व सदस्यांना मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्यासह फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत या दोन मुलींना २१,१११ रुपये रोख स्वरूपात आहेर देत आर्थिक मदत केली. तसेच नवदांपत्यास पुढील वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या मदतीमुळे विवाह सोहळ्याच्या आयोजनाला मोठा हातभार लागला असून, माई बालभवन संस्थेचे पदाधिकारी तसेच उपस्थित वऱ्हाडी मंडळींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमात ‘वुई टुगेदर फाउंडेशन’चे अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे यांच्यासह नंदकुमार वाडेकर, अनिल शिंदे, शंकर कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, राजेंद्र महाले, सरिता कुलकर्णी, विलास कडेकर, दारासिंग मन्हास, सलीम सय्यद, सीता केंद्रे, सदाशिव गुरव, दिलीप पेटकर, के. रंगराव, धनराज गवळी, रमाकांत उजळंबकर, उदय कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, श्रीरंग दाते, अर्जुन पाटोळे, एम. के. शेख, अपर्णा अष्टीकर, जावेद शेख, अनिल पोरे, झाकीर सय्यद, हनीफ सय्यद, राजेंद्र ताठे, रवी इंगळे, दत्तात्रय शेटे आदी सदस्यांनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला.
माई बालभवन संस्थेचे संचालक मधुकर इंगळे यांनी या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. सामाजिक संवेदनशीलतेतून दिलेल्या या मदतीमुळे निराधार अंध मुलींच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version