प्रभाग 3 मध्ये नितीनआप्पा काळजे यांची हॅट्रिक; विकासावर जनतेचा ठाम विश्वास, विक्रमी मतांनी दणदणीत विजय

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 चा निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक 3 मध्ये “विश्वासाचे प्रतीक आणि विकासाची नवी दिशा” ठरलेल्या मा. माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपली हॅट्रिक पूर्ण केली आहे. चऱ्होली, मोशी आणि डुडुळगाव परिसरातील जनतेने त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास म्हणजे मागील दशकभरातील सातत्यपूर्ण विकासकामांची पोचपावती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून, प्रभागातील सर्वसमावेशक विकास, लोकाभिमुख धोरणे आणि प्रामाणिक कार्यपद्धतीचा विजय आहे. भोसरी विधानसभेचे आमदार मा. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीनआप्पा काळजे यांनी प्रभाग 3 मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधा यावर विशेष भर देत प्रभागाचा कायापालट केला. त्यांच्या महापौर कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विकासकामांमुळे आज हा परिसर वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असून गगनचुंबी इमारती, नव्या सोसायट्या आणि पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत.
नागरिकांच्या अडचणींना रात्रंदिवस तत्परतेने प्रतिसाद देणारे, समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेणारे नेतृत्व म्हणून नितीनआप्पा काळजे यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनलचा दणदणीत विजय झाल्याचे जनतेतून व्यक्त होत आहे. प्रभागात नितीनआप्पा काळजे यांच्यासह सचिनभाऊ तापकीर, अर्चना सस्ते, सारिका गायकवाड हे देखील विजयी झाले आहेत.
तिसऱ्या कार्यकाळात जनतेच्या अपेक्षा अधिक वाढल्या असून, प्रभागासह संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करत नवे प्रकल्प, आधुनिक पायाभूत सुविधा आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. प्रचारादरम्यान त्यांनी मांडलेले “नवीन व्हिजन” आणि आतापर्यंत केलेली ठोस विकासकामे यामुळेच त्यांचा विजय निश्चित असल्याची भावना मतदारांमध्ये होती, आणि निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले.
या विजयामुळे चऱ्होली, मोशी व डुडुळगाव परिसराला हायटेक ओळख मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक मते मिळवून मिळवलेला हा विजय नितीनआप्पा काळजे यांच्यावरची जबाबदारी अधिक वाढवणारा असून, प्रभागाच्या प्रगतीला नवी गती देणारा ठरेल, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.




















