पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून साईमंदिर, वडमुखवाडी, चोवीसावाडी, चऱ्होली फाटा आणि आझाद नगर परिसरातील सर्व सोसायट्यांमध्ये माजी महापौर नितीनआप्पा काळजे, सचिनभाऊ तापकीर, सौ. अर्चना सस्ते आणि सौ. सारिका गायकवाड यांच्या प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्याला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील विकासकामांचा आढावा घेतला. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, शिक्षण, क्रीडांगणे तसेच महिलांसाठी सुरक्षिततेचे प्रश्न याबाबत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याची ठाम ग्वाही देण्यात आली. “विकास हा केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कामातून दाखवला आहे,” असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रभाग ३ चा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून नागरिकांच्या विश्वासावरच आम्ही राजकारण करत आहोत. सचिनभाऊ तापकीर यांनी युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, खेळाच्या सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले. तर सौ. अर्चना सस्ते व सौ. सारिका गायकवाड यांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
प्रचार दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत केले. “विकास आमचा ध्यास, जनता आमचा विश्वास” या घोषवाक्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. एकसंघ पॅनल, अनुभवसंपन्न नेतृत्व आणि स्पष्ट विकासनितीमुळे प्रभाग ३ मध्ये भाजपच्या उमेदवारांना मोठे बळ मिळत असल्याचे चित्र या प्रचार दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे.
