प्रभाग २८ मध्ये ‘काटे फॅक्टर’ निर्णायक? शत्रुघ्न काटेंच्या हॅट्रिकची चर्चा शिगेला
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजप उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्या संभाव्य हॅट्रिक विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील दोन निवडणुकांत मिळवलेल्या सलग विजयामुळे यंदाही त्यांच्या विजयाबाबत प्रभागात आशावादी वातावरण निर्माण झाले असून प्रचाराला मिळणारा प्रतिसाद या चर्चेला बळ देत आहे.
घरोघरी संपर्क, स्थानिक बैठका आणि नागरिकांशी थेट संवाद हा शत्रुघ्न काटेंच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, उद्याने तसेच मूलभूत नागरी सुविधांसाठी केलेल्या कामांची दखल मतदार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाशी असलेली समन्वयाची भूमिका यामुळे ‘काम करणारा नेता’ अशी त्यांची ओळख प्रभागात पक्की झाली आहे.
महिला, युवक, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांमधून मिळणारा पाठिंबा प्रचारात स्पष्टपणे जाणवतो. विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरू असले तरी शत्रुघ्न काटेंच्या प्रचारात दिसणारी ऊर्जा आणि जनतेशी असलेली जवळीक लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे प्रभाग २८ मध्ये पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
निवडणुकीचा निकाल अजून समोर यायचा असला तरी सध्या तरी प्रभाग २८ मध्ये शत्रुघ्न काटेंच्या हॅट्रिकची चर्चा हीच केंद्रस्थानी असल्याचे चित्र आहे.




















