Spread the love

 

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरात ‘जनसंवादातून विश्वास, विश्वासातून विकास’ या ठाम भूमिकेसह सामाजिक कार्यकर्त्या अनिता संदीप काटे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी विविध सोसायट्यांना प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन अडचणी, नागरी समस्या आणि अपेक्षा मनमोकळेपणाने मांडल्या.

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, ड्रेनेज, तसेच सोसायटीतील मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाची काटे दांपत्याने गांभीर्याने दखल घेतली. केवळ आश्वासनांपुरते न थांबता, संबंधित विषयांवर मनपाकडून पाठपुरावा करून ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“नागरिकांचा विश्वास हाच आमचा खरा आधार आहे. सेवा, समर्पण आणि विकास या त्रिसूत्रीवर काम करताना प्रत्येक समस्या वेळेत सोडवण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊ,” असे ठाम आश्वासन यावेळी देण्यात आले. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता, थेट मैदानात उतरून संवाद व कृती हीच आमची कार्यपद्धती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या जनसंवादाला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विश्वासाचे नाते अधिक घट्ट होत असल्याचे चित्र दिसून आले. पिंपळे सौदागरमध्ये विकासाला गती देण्यासाठी काटे दांपत्याने घेतलेली ही भूमिका येणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version