प्रभाग २६ मध्ये ‘तुतारी’चा सूर बुलंद; जनतेचा कौल राष्ट्रवादीकडे स्पष्ट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २६ मधील राजकीय चित्र दिवसेंदिवस अधिक स्पष्ट होत असून, काही माध्यमांतून रंगवले जात असलेले एकतर्फी दावे प्रत्यक्ष जनमताशी फारकत घेत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्या प्रभाग २६ मध्ये जनतेचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) व अधिकृत उमेदवार सौ. सारिका गणेश कास्पटे यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरोघरी प्रचार फेऱ्या, पदयात्रा आणि थेट नागरिकांशी साधलेला संवाद यामधून मिळणारा प्रतिसाद हेच या बदलत्या राजकीय वातावरणाचे द्योतक ठरत आहे. कास्पटे वस्ती, उत्कर्ष चौक, जानोबा चौक, कळाटे कॉलनी, साईनाथ कॉलनी, नंदवन कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी, विशालनगर, पिंपळनिलख अशा विविध भागांत झालेल्या प्रचारादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, विकासाभिमुख आणि विश्वासार्ह नेतृत्वाला संधी देण्याची तयारी दर्शवली आहे.
सौ. सारिका गणेश कास्पटे या केवळ निवडणुकीच्या काळात दिसणाऱ्या उमेदवार नसून, दीर्घकाळ सामाजिक, नागरी प्रश्नांवर सक्रिय असलेले नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. पाणी, रस्ते, आरोग्य, महिलांचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचा अनुभव मतदार सांगताना दिसत आहेत. त्यामुळे “यावेळी चेहऱ्यापेक्षा काम महत्त्वाचे” आणि “ज्यांनी अडचणीत साथ दिली, त्यांनाच मत” अशी स्पष्ट भूमिका मतदारांकडून व्यक्त होत आहे.
प्रचारादरम्यान अनेक नागरिकांनी, “फक्त पोस्टर, बॅनर आणि फोटोसेशनपेक्षा आमच्या प्रश्नांवर उभे राहणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे,” अशी भावना व्यक्त केली. हीच भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात वारंवार अधोरेखित होत असून, ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निवडणूक चिन्हाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, प्रभाग क्रमांक २६ मधील ही निवडणूक आता आरोप-प्रत्यारोप किंवा माध्यमांतल्या चर्चांपुरती मर्यादित राहिलेली नाही. प्रत्यक्ष मैदानात कोणावर जनतेचा विश्वास आहे, कोणाचे काम बोलते आहे, यावरच निकाल ठरणार आहे. सध्याच्या प्रचाराची दिशा, मतदारांचा प्रतिसाद आणि स्थानिक वातावरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रभाग २६ मध्ये स्पष्ट आघाडी मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत.




















