भाजप उमेदवार विनोद नढे यांना प्रभाग २२ मध्ये महिला आणि नागरिकांचे जबरदस्त जनसमर्थन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या सुशिक्षित व उच्च विचारसरणीच्या पॅनलने प्रचाराला वेग दिला आहे. आज विनोद नढे यांच्या पॅनेलने ज्योतिबानगर परिसरात विविध ठिकाणी भेटी, संवाद आणि बैठका घेत भाजप उमेदवारांनी नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला.
ज्योतिबानगर येथील फिरतीदरम्यान कॉलनी, गल्ल्या व वस्ती पातळीवर नागरिकांशी संवाद साधण्यात आला. परिसरातील विकासकामे, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षिततेसारख्या प्रश्नांवर चर्चा करत भाजप पॅनलने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या.
विशेष म्हणजे, सायंकाळी महिलांसाठी स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिला सक्षमीकरण, आरोग्य सुविधा, बचत गट, सुरक्षित सार्वजनिक जागा आणि महिला केंद्रित योजनांवर सविस्तर चर्चा झाली. “महिलांचे प्रश्न समजून घेणारे आणि त्यावर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व हवे,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
या प्रचार दौर्यात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटित प्रचार, नियोजनबद्ध संपर्क आणि थेट जनसंवाद या माध्यमातून भाजप पॅनल प्रभाग २२ मध्ये आपली पकड मजबूत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रभाग २२ मध्ये भाजपचा प्रचार फक्त घोषणांपुरता न राहता मुद्देसूद आणि विकासकेंद्री होत चालला आहे. सुशिक्षित उमेदवार, स्पष्ट विकास दृष्टीकोन आणि महिला-नागरिकांचा वाढता सहभाग पाहता, प्रभाग २२ मधील लढत अधिक रंगतदार होत असून भाजप पॅनलला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रभाग २२ मध्ये भाजपच्या पॅनलचा प्रचार शिस्तबद्ध व प्रभावी होत असून, आगामी निवडणुकीत ही रणनीती निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.




















