पिंपरी प्रभाग २१ मध्ये ‘घड्याळाची टिक-टिक’ प्रचंड; चारही उमेदवारांनी विरोधकांची झोप उडवली
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराने अंतिम टप्प्यात प्रवेश केला असताना पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळा’ची टिक-टिक दिवसेंदिवस अधिकच जोरात ऐकू येत आहे. प्रभागातील चारही उमेदवार — निकिता कदम, संदीप वाघेरे, प्रियांका कुदळे आणि डब्बू आसवाणी — यांच्या आक्रमक, नियोजनबद्ध आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या प्रचारामुळे विरोधकांमध्ये स्पष्टपणे धसका निर्माण झाला आहे.
प्रभागातील गल्लोगल्ली, सोसायट्या, बाजारपेठा आणि वस्ती भागांमध्ये घरोघरी भेटी, पदयात्रा आणि बैठकींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या चौघांनी प्रभावीपणे राबवला आहे. विकासकामांचा लेखाजोखा, स्थानिक प्रश्नांची जाण, तसेच भविष्यातील ठोस आराखडा यामुळे मतदारांमध्ये ‘घड्याळ’ चिन्हाबद्दल विश्वास अधिक बळावल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे या प्रचारात कोणतेही आरोप-प्रत्यारोप न करता थेट विकास, पारदर्शक प्रशासन, मूलभूत सुविधा, महिला-युवकांसाठी संधी आणि नागरी सोयीसुविधांवर भर देण्यात येत आहे. याच सकारात्मक प्रचारपद्धतीमुळे मतदारांचा कल झपाट्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडे झुकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आज दिवसभर झालेल्या प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणी मतदारांनी उमेदवारांशी मनमोकळा संवाद साधत पाठिंब्याची ग्वाही दिली. काही भागांत तर ‘घड्याळाची टिक-टिक’ हेच घोषवाक्य होत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
प्रभाग क्रमांक २१ मध्ये निर्माण झालेली ही राजकीय लाट पाहता चारही उमेदवारांची मजबूत पकड आणि संघटित प्रचारयंत्रणा विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विरोधकांकडून हालचाली वाढल्या असून, पिंपरी प्रभाग २१ हा यावेळी निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















