पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेची रणधुमाळी; राष्ट्रवादीच्या प्रचाराला वेग, आज चिखलीत जाहीर सभा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रचाराला बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य जाहीर सभा पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
आज गुरुवारी, ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता, चिखली घरकुल, श्रीराम चौक मैदान येथे ही जाहीर सभा पार पडणार असून, या सभेकडे संपूर्ण शहराचे राजकीय लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होत असून, महाविकास आणि सत्तासमीकरणांच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
अजितदादा पवार यांच्या आक्रमक भाषणशैलीमुळे आणि थेट मुद्द्यांवर केलेल्या मांडणीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.
स्थानिक नेते, पदाधिकारी आणि उमेदवारांनी सभेच्या तयारीस जोर लावला असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या जाहीर सभेमुळे निवडणुकीच्या प्रचाराला नवा वेग मिळणार असून, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अजितदादांची ही उपस्थिती राजकीय शक्तिप्रदर्शन ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.




















