प्रभाग १० मध्ये प्रा.दत्तात्रय भालेराव यांचा जनसंपर्काचा झंझावात; दत्तजयंतीतून निवडणूक रणशिंग फुंकल्याचे संकेत
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १० मध्ये दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक भेटींच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याची राजकीय मोहीम सुरू करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे इच्छुक दत्तात्रय भालेराव सर पुन्हा एकदा प्रभागाच्या राजकीय केंद्रस्थानी आले आहेत. मोरवाडी, इंदिरानगर, शाहूनगर येथील विविध दत्त मंदिरांना दिलेल्या भेटीमध्ये त्यांनी दत्तभक्तांसोबत संवाद साधत सदिच्छा व्यक्त केल्या आणि स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली.
दत्तजयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत दत्तात्रय भालेराव सर यांनी पूजा अर्चा करून प्रभागातील शांतता, सौहार्द आणि विकासासाठी प्रार्थना केली. या भेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्ते, महिला मंडळे, युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. धार्मिक वातावरणात राजकीय संवादाची जोड देत दत्तात्रय भालेराव सर यांनी प्रभागातील महत्त्वाच्या प्रश्नांवर नागरिकांकडून थेट सूचना स्वीकारल्या.
मोरवाडी, इंदिरानगर आणि शाहूनगर परिसरातील नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, प्रलंबित विकासकामे आणि नगरसेवकांकडून अपेक्षित असलेल्या नव्या उपक्रमांबाबत मोकळेपणाने चर्चा केली. नागरिकांच्या या अपेक्षांना गंभीरतेने घेत दत्तात्रय भालेराव सर यांनी विकासकामांना गती देण्याची ग्वाही दिली.
राजकीय वर्तुळात प्रा दत्तात्रय भालेराव यांच्या या भेटींची विशेष चर्चा आहे. दत्तात्रय भालेराव हे माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्व परिचित आहे. आगामी निवडणुकीत प्रभाग १० चे समीकरण बदलण्याची क्षमता असलेल्या नेत्याने अशी प्रभावी उपस्थिती दाखवणे हा स्पष्ट राजकीय संदेश मानला जात आहे. धार्मिक उत्सवातून जनसंपर्काची उभारी आणि नागरिकांशी थेट संवाद—या दोन्हींच्या मिश्रणामुळे दत्तात्रय भालेराव यांची ही मोहीम निवडणूकपूर्व टप्प्यात मोठा प्रभाव पाडणारी ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
दत्तात्रय भालेराव सर म्हणाले, “प्रभागातील विकासकामे अधिक गतीमान करण्यासाठी आणि नवीन प्रकल्प राबवण्यासाठी नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवणे अत्यावश्यक आहे. दत्तजयंती हा आध्यात्मिक ऊर्जा देणारा दिवस असून प्रभागाच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
धार्मिक भावना, राजकीय रणनीती आणि जनतेचा प्रतिसाद—या तिन्हींचा संगम साधत प्रभाग १० मध्ये प्रा दत्तात्रय भालेराव सरांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे: ते पुन्हा रिंगणात उतरले आहेत, आणि जनतेची नाळ जुळवण्याची तयारी पूर्ण झाली आहे.



















