ताज्या घडामोडीपिंपरी

वाकड येथे शनिवारी ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रम

जनतेच्या समस्यांचे तातडीने निवारण व्हावे याकरिता आमदार शंकर जगताप यांचा उपक्रम

Spread the love

 

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने “आमदार आपल्या दारी” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत चिंचवड मतदारसंघातील वाकड भागातील नागरिकांच्या समस्या थेट आमदारांच्या उपस्थितीत आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत ऐकल्या जाणार आहेत.

या उपक्रमाचा पुढील टप्पा वाकड येथील प्रभाग क्र. २५ व २६ मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वाकडमधील हॉटेल बर्ड व्हॅली येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

उपलब्ध सेवा आणि सुविधा

कार्यक्रमामध्ये खालील शासकीय सेवा व समस्या निवारणासाठी नागरिकांना मदत करण्यात येणार आहे:

* शासकीय योजना आणि त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन
* शासकीय दाखले (उदा. रहिवासी, उत्पन्न, जात इत्यादी)
* रेशनकार्डसंबंधित तक्रारी आणि अर्ज
* पाणी, वीज, ड्रेनेज, आरोग्य यासंबंधी समस्या
* महापालिका व इतर शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी
* सर्वसामान्य नागरिकांच्या विविध अडचणींचे तात्काळ निवारण.

एकाच ठिकाणी सर्व सेवा

या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, शहरी आरोग्य केंद्र, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आधार कार्ड सेवा, तसेच राजस्व विभाग आदींसह अनेक शासकीय यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय कामांसाठी मदत मिळणार आहे.

तक्रारींसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि अर्जासंदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत सोबत आणावी, जेणेकरून त्यांचे प्रश्न लवकर सोडवता येतील. कोणतीही अडचण न राहावी, यासाठी कार्यक्रमस्थळी स्वयंसेवकांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्व अर्जदारांनी लेखी अर्ज आणि पत्राद्वारे अर्ज दाखल करावा जेणेकरून आपल्या तक्रारीचे निवारण करणे सोपे व सोयीचे जाईल.

“नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवणे, प्रशासन व जनतेत थेट संवाद साधणे, हे आमचे कर्तव्य आहे. समस्यांवर वेळेत उपाय होणे हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे,”
-आमदार शंकर जगताप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button