मातृभाषेतील शिक्षण जीवनातील वादळे सोसण्याचे बळ देते! – विश्वास पाटील
चौथे इंद्रायणी साहित्य संमेलन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘मातृभाषेतील शिक्षण जीवनातील वादळे सोसण्याचे बळ देते!’ असे विचार सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि सातारा येथील नियोजित ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, मोशी येथे (रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५) व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर विश्वास पाटील बोलत होते. संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
विश्वास पाटील पुढे म्हणाले की, ‘जीवनाची सुरुवात रडगाण्याऐवजी हास्यातून झाली तर जीवन सुखद होते. पानिपतावरचा धडा शिकवला जात असताना मी शाळेला दांडी मारून मामाच्या गावाला गेलो होतो. नेमका गुरुजींनी मला ‘पानिपताची तीन युद्धं कधी झाली?’ असा प्रश्न विचारल्यावर मला छडीचा प्रसाद मिळाला होता. आपला इतिहास, आपली संस्कृती काळजात जपली तर लेखन करणे सुलभ होते. पुणे जिल्ह्यातील संत, महंत यांच्याबरोबर उत्कृष्ट तमासगीरदेखील होते. पाटलाचा पोर असल्याने तमाशाला जाण्याचा परिपाठ होता. राज हरिश्चंद्र, संत तुकाराम यांची चरित्र मी तमाशातून अनुभवली. तसेच तमाशातून लोकसंगीत ऐकले. मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. या शाळेतील विद्यार्थी म्हणजे ‘रानातले गरुड’ असतात. कितीही संकटे आली तरी हे गरुड डगमगून जात नाहीत. शाळेत संत एकनाथमहाराजांची गवळण मी तन्मयतेने म्हणत असे. शालेय जीवनातील बहुरंगी, बहूढंगी अनुभव साहित्यलेखनात कामी आले. अनेक प्रतिभावंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आहेत. इंद्रायणी नदीच्या काठी सुरू केलेला हा साहित्ययज्ञ आहे. त्यातून स्फूर्ती निर्माण व्हावी!प्रत्येक नदीच्या काठावर त्या नदीच्या नावाने साहित्य संमेलन भरायला हवे. नवोदितांनी आपले लेखन परिपक्व होण्याआधीच ते प्रकाशित करण्याची घाई करू नये. उत्तम कलकृतीचा सुगंध आपोआप दरवळतो. वयाच्या सतराव्या वर्षी मी ‘आंबी’ ही स्त्रीप्रधान कादंबरी लिहिली, त्यातील शोकांतिका वास्तवावर आधारित होती. जगातील सर्व महापुरुषांमध्ये मला छत्रपती शिवाजीमहाराज यांची पावले अलौकिक वाटतात!’ असे सांगून विश्वास पाटील यांनी आपल्या आगामी साहित्यकृतीविषयी श्रोत्यांना माहिती दिली.
याप्रसंगी डाॅ. राजा दीक्षित यांनी, ‘इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डाॅ. सीमा काळभोर आणि परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर हे दोन्हीही माझे विद्यार्थी आहेत, हा मी भाग्ययोग समजतो. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या सन्मानाचा मी साक्षीदार झालो याचा आनंद वाटतो!’ अशा भावना व्यक्त केल्या. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.




















