विशाल वाकडकर यांच्या आवाहनाला गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद – पर्यावरण पूरक विसर्जन हौदातून ४००० पेक्षा जास्त मूर्ती संकलित

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते श्री विशाल वाकडकर यांच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाच्या आवाहनाला वाकड व पिंपरी-चिंचवड परिसरातील गणेश भक्तांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यांनी उभारलेल्या पर्यावरण पूरक विसर्जन घाटातून यंदा जवळपास ४२०० गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले.
पर्यावरणाचे जतन आणि जलप्रदूषण रोखण्याच्या मुख्य उद्देशाने श्री विशाल वाकडकर यांनी वाकड येथील द्रौपदा मंगल कार्यालयाजवळ पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन घाटाची निर्मिती केली आहे. मागील सहा वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात असून गणेशोत्सव काळात नागरिक मोठ्या संख्येने येथे विसर्जनासाठी सहभागी होत आहेत.
या वर्षी अकरा दिवसांत चार हजार दोनशे मूर्तींचे संकलन झाले असून, संकलित मूर्तींचे श्री फाउंडेशन पुणे या संस्थेमार्फत पुनर्निर्मिती व रंगरंगोटी करून ‘गणपती दान’ योजना राबवली जाते. या योजनेतून मिळणारा निधी अनाथ मुलांच्या संगोपनासाठी, शिक्षण व आरोग्य सेवांसाठी वापरण्यात येतो.
गणेश भक्तांसाठी येथे स्वतंत्र आरती कक्ष, निर्माल्य कलश, वाहनतळ, प्रकाश व्यवस्था यांसह उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला.
आगामी काळातही नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील, असे श्री विशाल विशाल वाकडकर यांनी सांगितले.














