स्मार्ट सिटीतील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता , प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 184 पदे रिक्त, शिक्षकांची तत्काळ भरती करा -विशाल बाळासाहेब काळभोर यांची आग्रही मागणी

– शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांना निवेदन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिर शाळेत १ ते ७ वी पर्यंत सुमारे १५० पटसंख्या असलेल्या वर्गासाठी केवळ दोनच शिक्षक सेवा देत आहेत. असे असताना महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये शिक्षकांची कमरता असून प्राथमिक शाळांमध्ये तब्बल १८४ पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, देशाची भावी पिढी अंधारात चाचपडत आहे. ही बाब स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहरासाठी शोकांतिका आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची तत्काळ भरती करावी, अशी आग्रही मागणी युवा नेते विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.
याबाबत विशाल काळभोर यांनी महापालिका शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन दिले. तसेच महापालिका शाळांमधील विविध समस्यांबाबत चर्चा केली. याला सहायक आयुक्त मोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मार्फत बालवाडी ते आठवीपर्यंतच्या मराठी, इंग्रजी, ऊर्दू आणि हिंदी माध्यमाच्या १०५ शाळा तर १८ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये गोर -गरीब नागरिकांची सुमारे ५० हजारांहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या ९ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त आहे. पदवीधर आणि उपशिक्षक अशी १७५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होत आहे.
२०२५ – २६ हे शैक्षणिक वर्ष १४ जून रोजी सुरू झाले आहे. महापालिका शाळांमध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप पूर्ण झाले असून काहींचे अद्याप वाटप सुरूच आहे. मात्र, शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला. महापालिकेच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसह सर्वच शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे गोर -गरीब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे काळभोर यांनी महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची घटक चाचणी परीक्षा येत्या दि.४ ते दि. ६ ऑगस्ट दरम्यान होत आहे. परीक्षा तोंडावर असताना शाळेत पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये तत्काळ कंत्राटी पध्दतीने शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ऑगस्टअखेर रिक्त पदांची भरती केली जाईल, असे आश्वासन शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी युवा नेते विशाल काळभोर यांना दिले आहे.
कोट
२०२५ – २६ हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला. वास्तविक शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांची भरती करणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांची घटक चाचणी परीक्षा तोंडावर असताना अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकच नाहीत. काळभोरनगर येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिर शाळेत १ ते ७ पर्यंत सुमारे १५० पटसंख्या असलेल्या वर्गासाठी केवळ दोनच शिक्षक सेवा देत आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता कशी सुधारेल, हा खऱा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती करावी. पिटी शिक्षक, खेळांसाठी स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक करावी.
-विशाल बाळासाहेब काळभोर















