भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आक्रमक – विजय जरे

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोरेवस्ती – म्हेत्रेवस्ती परिसरातील नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. परिसरात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवर हल्ल्याचा धोका, रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, तसेच परिसरातील स्वच्छता आणि आरोग्यावर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.या गंभीर पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहर अध्यक्ष विजय जरे यांनी नागरिकांच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात खालील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या:
भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात.कुत्रा पकडण्यासाठी येणाऱ्या गाड्यांमध्ये कार्यक्षमतेचा अभाव असून, त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवावे.
संबंधित प्रभागात आठवड्यातून किमान तीन वेळा कुत्रा पकडण्याचे अभियान राबवले जावे.
नागरिकांना सुरक्षित, शांत आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत.
या निवेदनप्रसंगी समाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे व किशोर भंडारी हे देखील उपस्थित होते.
नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या भीतीमुळे असुरक्षिततेची भावना वाढत असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या या मागण्यांना तातडीने प्रतिसाद देत ठोस कारवाई केली जावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.













