ताज्या घडामोडीपिंपरी

‘वंदे मातरम्’ने राष्ट्रभावना प्रज्वलित केली – नारायण देशपांडे

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘बंकिमचंद्र चटोपाध्याय हे भारतीय राष्ट्रीय विचारप्रवाहाचे मूळ प्रेरणास्थान आहेत. ‘वंदे मातरम्’ या गीताने त्यांनी भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाची तेजस्वी ज्योत चेतवली!’ असे प्रतिपादन अभ्यासक नारायण देशपांडे यांनी केले. समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने आयोजित केलेल्या ‘वंदे मातरम् – राष्ट्रचेतना स्तोत्र…’ या विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह (पेठ क्र. २६, निगडी प्राधिकरण) येथे झालेल्या या कार्यक्रमात देशपांडे यांनी बंकिमचंद्र यांच्या जीवनातील अपमानाच्या खोल अनुभवातून आणि मातृभूमीच्या भावदर्शनातून ‘वंदे मातरम्’ची निर्मिती कशी घडली, याची सांगोपांग मांडणी केली. ‘आनंदमठ’ कादंबरीतून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवचैतन्य देणारी सूचक दिशा दिली, असे त्यांनी स्पष्ट केले.

रवींद्रनाथ ठाकूर यांनी १८९६ मध्ये ‘वंदे मातरम्’ प्रथम सार्वजनिकरीत्या गायले. १९०५ च्या स्वदेशी आंदोलनात या गीताचा प्रभाव वाढताच ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घातली. संविधान स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा बहाल करण्यात आला.

कार्यक्रमाला ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे शिक्षण विभागप्रमुख शिवराज पिंपुडे, मंडळाचे अध्यक्ष विजय कर्ता, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘स्फूर्तिदायी गीते विद्यार्थ्यांच्या मनःसंस्कारासाठी आवश्यक आहेत!’ असे मत शिवराज पिंपुडे यांनी व्यक्त केले.

अनुष्का सामंत आणि श्रेया आगरवाल यांच्या ‘वंदे मातरम्’वरील शास्त्रीय नृत्याने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी फुलांच्या पाकळ्यांच्या रांगोळीत ‘वंदे मातरम्’ रेखाटून प्रज्वलित दीपांनी सजावट करण्यात आली होती. समृद्धी पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश भिडे आणि क्षिप्रा पटवर्धन यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. ॲड. हर्षदा पोरे यांनी प्रास्ताविक केले; तर कोषाध्यक्ष विकास देशपांडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता एस. पी. एम. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सांगीतिक ‘वंदे मातरम्’ने झाली.
असंख्य देशप्रेमी श्रोत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button