“पिंपरी-चिंचवड ते कारवार बससेवा सुरू नागरिकांच्या मागणीला यश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पिंपरी-चिंचवड आणि कारवार या दोन शहरांदरम्यान थेट बससेवेची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली असून, आज या बससेवेचे उदघाटन उत्साहात पार पडले. पिंपरी-चिंचवड आगारातून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य काळुराम नढे, माजी नगरसेवक विनोद नढे, चिंचवड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख वैशाली कांबळे, तसेच कारवार मित्र मंडळाचे अध्यक्ष महेंद्र राणे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नागरिकांकडून कारवारकडे नियमित बससेवेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. पर्यटन, नोकरी, शिक्षण आणि व्यापाराच्या दृष्टीने या मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढत असताना बससेवेअभावी नागरिकांना त्रास होत होता. अखेर आमदार शंकर जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे ही बससेवा सुरु करण्यात आली आहे.
या नव्या सेवेमुळे पिंपरी-चिंचवड, निगडी, देहूरोड, लोणावळा, पुणे जिल्हा आणि कोकणातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारवार मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा नियमित स्वरूपात चालविण्याचा संकल्प परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.
उदघाटनावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “ही बससेवा केवळ प्रवासाची सुविधा नाही, तर दोन भागांना जोडणारा विकासाचा दुवा आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घेत ती यशस्वी करावी,” असे आवाहनही करण्यात आले.













