ताज्या घडामोडीपिंपरी

लग्नात चारचाकी व १५ तोळे सोने देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ राज्य महिला आयोग व पोलीस आयुक्तांनीही घेतली नाही दखल

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात पुण्यातील प्रतिष्ठित व उच्चभ्रू परिवारातील वैष्णवी हगवणे हुंडा व त्यातून हत्या की आत्महत्या प्रकरण गाजत असताना पुण्यातील आयटी हब असणाऱ्या हिंजवडी येथील लग्नात चारचाकी गाडी, १५ तोळे सोने, तसेच इतर महागड्या वस्तू देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ होत आहे. याबाबत राज्य महिला आयोगाकडे व पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करूनही अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आपला छळ सुरूच असल्याची माहिती ऐश्वर्या आदित्य हुलावळे यांनी पत्रकार परिषद दिली. यावेळी ऐश्वर्या यांचे आईवडील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना ऐश्वर्या हुलावळे (माहेरचे नाव ऐश्वर्या बबन गव्हाणे) यांनी सांगितले, की पती आदित्य अरुण हुलावळे यांच्याशी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी मयुरी पॅलेस, आळंदी रोड, भोसरी येथे हिंदू विवाह पद्धतीने मोठ्या थाटामाटात पार पडला होता. यावेळी माझ्या वडिलांनी सासरकडच्यांनी लग्नात मागणी केल्याप्रमाणे एक चारचाकी वाहन (सासूच्या नावावर रजिस्टर), १५ तोळे सोन्याचे दागिने व अन्य सुख सुविधेच्या सर्व वस्तू लग्नात दिल्या गेल्या. वडील ८१ टक्के दिव्यांग असूनही केवळ मुलीच्या सुखासाठी त्यांनी लग्न चांगल्या प्रकारे लावून दिले होते.
लग्नानंतर पती, सासू, दीर, आजोबा, मावस सासू, मावस सासरे यांनी काही दिवसांतच छळ करण्यास सुरवात केली. लग्नानंतर तीन महिन्यानंतर पतीचे बाहेरील अनैतिक संबंध कळल्यावर सासरच्यांनी पतीला समज देण्याऐवजी मला मारहाण, शिवीगाळ करीत माझा छळ सुरू केला. तसेच ‘माहेरून पाच लाख रुपये घेऊन आल्यास नांदवू, अन्यथा घरातून निघून जा’ अशी वारंवार धमकी देत रात्री साडेबाराच्या सुमारास मारहाण केली व घराबाहेर काढण्याची धमकी दिली जात होती.

वारंवार होत असलेले अत्याचार, शिवीगाळ, धमक्या देत असल्याने अखेर या संदर्भात डिसेंबर २०१७ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलीस ठाण्यातही सासरच्याकडून ‘तू जर तक्रार दाखल केली, तर आम्ही तुला नांदवणार नाही’, अशी धमकी दिली गेली. ५ जानेवारी आणि १५ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन तक्रार अर्ज दिला. यावेळी दोन्ही कुटुंबाला एकत्रित बोलावून एकमेकांची समजूत काढून मिटवून घेण्यास सांगितले गेले. मात्र, यावेळी देखील प्रकरण मिटले नाही. त्यानंतर पुन्हा ३ मार्च २०१८ ला हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांकडून तकारीची दखल घेतली गेली नाही. २४ डिसेंबर २०१८ रोजी मात्र मी खूप प्रयत्न केल्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी एफआयआर नोंदवला.
हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करताच ३ जानेवारी २०१९ रोजी मी माहेरी गेले. ५ जानेवारी रोजी वकिलाकडून नोटीस देण्यात आली. या नोटीसला मी दोघांकडून तसे हमीपत्र लिहून घेणार असाल, तर हमीपत्र देण्यास तयार आहे, असे उत्तर दिले होते. त्यानंतर सप्टेंबर २०१८ रोजी पतीकडून घटस्फोट बाबत पत्र देण्यात आले.

कोरोना लॉक डाऊन काळ व परिस्थिती काही शांत होती. मात्र, पुन्हा २०२२ च्या सुरवातीपासून पुन्हा हुलावळे कुटुंबाकडून धमक्या देत तक्रार मागे घेण्यासाठी तगादा लावला जात होता. यावेळी मी याबाबत पुन्हा तक्रार दाखल केली.
तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मार्च २०२५ मध्ये तक्रार अर्ज केला. मात्र, त्यांच्याकडून देखील माझी दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलीस प्रशासनही मदत करीत नसल्याचा आरोप ऐश्वर्या हुलावळे यांनी केला असून, महिलांवरील अत्याचारा संदर्भात व त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा महिलांवरील होत असणाऱ्या हुंडा व त्यातून आर्थिक व शारीरिक छळ होत आहेत. दोषींवर कारवाई करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ऐश्वर्या हुलावळे यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button