उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा : ३०० व्या जयंतीनिमित्त ३०० रोपांचे वाटप

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड येथील आघाडीची सामाजिक संस्था असलेल्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध प्रजातीच्या ३०० रोपांचे नागरिकांना वाटप करत , पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना उन्नती सोशल फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य म्हणजे केवळ राजकीय किंवा सामाजिक नाही, तर पर्यावरणस्नेही शासक म्हणूनही त्यांचा ठसा इतिहासावर आहे. १७व्या-१८व्या शतकात शासन करत असताना त्यांनी नदी व जलस्रोतांचे संवर्धन, वृक्ष लागवड, आणि संधारण आधारित विकास या गोष्टींवर विशेष भर दिला.नद्यांची शुद्धता आणि महत्त्व ओळखून त्यांनी गंगा, नर्मदा, यमुना यांसारख्या प्रमुख नद्यांच्या तीरावर घाट, मंदिरे आणि यात्रेसाठी सुरक्षित व स्वच्छ जागा उभारल्या. यामागे केवळ धार्मिक नाही, तर पर्यावरणीय दृष्टिकोनही होता.त्यांच्या कार्यकाळात तलाव, विहिरी, घाट व बंधाऱ्यांचे निर्माण मोठ्या प्रमाणावर करण्यात आले, जे आजही अनेक भागांत कार्यरत आहेत. पाण्याचा शाश्वत वापर हा त्यांचा व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू होता. आज रोपवाटप करून उन्नती सोशल फाउंडेशन द्वारे एक प्रकारे वरूणराजाला साकडे घालण्यात आलेले आहे.”
उपक्रमाला शुभेच्छा देताना , भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले , “राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्ताने उन्नती सोशल फाउंडेशन यांनी सामाजिक बांधिलकी जपत रोपवाटपाचा सुंदर उपक्रम राबवला, हे पाहून मनाला अत्यंत समाधान आणि अभिमान वाटतो.अहिल्यादेवी होळकर या केवळ एक महान स्त्री शासक नव्हत्या, तर त्या पर्यावरणप्रेमी, समाज हितदक्ष आणि धर्मशील विचारसरणीच्या प्रतीक होत्या. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, आजच्या युगात पर्यावरण रक्षणासाठी उचललेले हे पाऊल खरोखरच प्रेरणादायी आहे.झाडं लावणं ही भविष्यासाठीची शाश्वत गुंतवणूक आहे आणि उन्नती सोशल फाउंडेशनने हे योग्य प्रकारे समजून आजचा दिवस अर्थपूर्ण केला आहे. या सामाजिक उपक्रमात सहभागी सर्व कार्यकर्ते, संयोजक आणि उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन.!”
याप्रसंगी , उन्नती सोशल फाउंडेशन चे संस्थापक संजय तात्याबा भिसे , अध्यक्षा डॉ.कुंदा संजय भिसे , भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे यांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशन चे सर्व सभासद तरुण वर्ग आणि पिंपळे सौदागर परिसरातील देशप्रेमी नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.









