“स्वरामृत दिवाळी पहाट” संगीताच्या सुरांनी उजळली पिंपळे सौदागरची पहाट
उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळीच्या मंगल वातावरणात उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरामृत दिवाळी पहाट” या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम १८ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ६ वाजता आणि १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता तसेच संध्याकाळी ६ वाजता शिव छत्रपती शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डन, गोविंद यशदा चौक, पिंपळे सौदागर येथे उत्साहात संपन्न झाला.
चिंचवड विधानसभेचे आमदार मा.श्री.शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती स्वरामृत दिवाळी पहाटला होती.
या दोन दिवसांच्या सुरेल पर्वात प्रख्यात आणि लोकप्रिय कलाकारांनी आपली कला सादर केली. त्यामध्ये सारेगमप फेम महेश कंटे, सुरमणी भाग्यश्री देशपांडे, सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र खोमणे, गायिका आनंदी जोशी, झी सारेगमप विजेत्या अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड या गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने पिंपळे सौदागर वासीयांना मंत्रमुग्ध केले.
‘स्वरामृत दिवाळी पहाट’ च्या आयोजनामागील संकल्पना विशद करताना शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पिं. चिं. भाजप शहराध्यक्ष म्हणाले , “उन्नती सोशल फाउंडेशन आणि आमच्या युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केवळ समाजकारणच नव्हे, तर संस्कृतीकारणालाही चालना देण्याचा प्रयत्न करीत आहोत. ‘स्वरामृत दिवाळी पहाट’ हा उपक्रम नागरिकांच्या सांस्कृतिक जीवनात आनंदाचे रंग भरणारा ठरेल. स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हीच आमची खरी प्रेरणा आहे.”
आयोजिका आणि उन्नती सोशल फाउंडेशन चे अध्यक्षा डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि ऐक्याचा उत्सव. या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून संगीताच्या माध्यमातून आनंद वाटण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. स्वरामृत दिवाळी पहाट हे पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरले आहे. ०७ वर्षांपूर्वी दिवाळी पहाटची आम्ही उन्नती सोशल फाऊंडेशनच्या मार्फत सुरुवात केली त्यावेळेस अगदी मोजके १०० ते १५० लोक असायचे आज ही संख्या दोन हजारांवर पोहोचली आहे. या माध्यमातून पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील सांस्कृतिक चळवळीला दिशा मिळत आहे याचे मनस्वी समाधान आहे.”
चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. शंकर जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “संस्कृती आणि समाजकारण यांचा संगम घडवणारे असे उपक्रम शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सांस्कृतिक अनुभव देण्याचे कार्य उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाउंडेशन यांनी केले आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. मी सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
स्वरमृत दिवाळी पहाटच्या दोन्ही दिवशी पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील संगीत प्रेमी नागरिक बंधू भगिनी यांनी उत्स्फूर्त आणि उदंड उपस्थिती लावली.




















