उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे मालेगाव मधील चिमुकलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ संताप सभा; आरोपीला कडक शासन व्हावे – डॉ. कुंदा भिसे

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डोंगराळे (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने सर्वत्र प्रचंड संताप उसळला आहे. या अमानवी प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी समस्त ग्रामस्थ पिंपळे सौदागर आणि उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने संताप सभेचे आयोजन करण्यात आले. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण येथे भरलेल्या या सभेत मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक व लहान मुले सहभागी झाली.
सभेची सुरुवात चिमुकलीला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकमुखाने या निर्दयी कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आरोपींवर अत्यंत कडक, उदाहरण ठरतील अशी शिक्षा तातडीने व्हावी, अशी मागणी केली. बालसुरक्षेच्या प्रश्नावर समाज म्हणून अधिक सजग होण्याचा संकल्पही यावेळी घेण्यात आला.
या प्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा संजय भिसे यांनी संतापपूर्ण शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हणाल्या , “३ वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर असा राक्षसी अत्याचार होतो म्हणजे मानवताच लज्जित होते. अशा नराधमांना कडकात कडक शिक्षा झालीच पाहिजे. समाजात भीती आणि कायद्याबद्दलचा आदर पुन्हा निर्माण करायचा असेल, तर अशा गुन्हेगारांवर अतिशय कठोर कारवाई अनिवार्य आहे. एक चिमुकली गमावली ही वेदना आपली सर्वांचीच आहे.
याप्रसंगी , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल, मीनाक्षी देवतारे, यांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे सर्व सभासद पिंपळे सौदागर परिसरातील संवेदनशील नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.




















