त्यागराज खाडिलकर आणि सहकलाकारांच्या गायनाने ‘सुरमयी दिवाळी पहाट’चा शानदार समारोप
संगीताच्या सुरांनी गाजली पिंपळे गुरवची ‘सुरमयी दिवाळी पहाट'

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित चार दिवसीय ‘सुरमयी दिवाळी पहाट’चा पार्श्वगायक त्यागराज खाडिलकर, व्हर्सेंटाईल सिंगर ममता नेने – गोगटे, पार्श्वगायक संतोष माहेश्वरी, पार्श्वगायिका रोहिणी पांचाळ, पार्श्वगायक नितीन कदम यांच्या गायनाने बुधवारी शानदार समारोप झाला. संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी नगरसेवक अप्पा रेणुसे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, तानाजी काळभोर, डॉ. प्रदीप ननवरे, कीर्तनकार सायली जगताप- देशमुख, माजी नगरसेवक संतोष कांबळे, राजू लोखंडे, संजय जगताप, शिवाजी पाडुळे, दिलीप तनपुरे, सूर्यकांत गोफणे, माजी नगरसेविका माई काटे, चंदा लोखंडे, बाबुराव शितोळे, कविता राजेंद्र जगताप, छाया विजूअण्णा जगताप, आयोजक वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ऍड. अभिषेक जगताप आदी उपस्थित होते.
गायक त्यागराज खाडिलकर यांनी घन:शाम सुंदरा,
तीर्थ विठ्ठल, मधुबन में राधिका, माझे माहेर पंढरी, गं साजणी या रचना सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. चतुरस्र गायिका ममता नेने गोगटे यांनी प्रसिद्ध गायक व गायिकांच्या आवाजात गाणी गात रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. त्यांनी मोनिका ओ माय डार्लिंग, लंबी जुदाई, आनेवाला पल जानेवाला हैं अशी गीते गायक गायिकांच्या आवाजात गायन करून प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रत्येक गाण्यानंतर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. संगीत क्षेत्रातील विविध आवाजांची अशी जिवंत अनुभूती देणारा हा कार्यक्रम दीर्घकाळ लक्षात राहील, अशी प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली.
मन उधान वाऱ्याचे, पाहिले ना मी तुला, गंध फुलांचा गेला सांगून, गोमू संगतीनं, चिंब पावसात, निसर्ग राजा ऐक सांगतो, अबीर गुलाल, कानडा राजा पंढरीचा, परदेसीया… अशl गायक संतोष माहेश्वरी, पार्श्वगायिका रोहिणी पांचाळ, पार्श्वगायक नितीन कदम यांच्या गाण्यांनी सभागृह दणानून सोडले.
प्रास्ताविक माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केले. गेल्या सतरा वर्षातील दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच भविष्यातही नियमितपणे हा कार्यक्रम सुरूच राहणार असल्याची ग्वाही दिली. आभार ऍड. अभिषेक जगताप यांनी मानले.


















