शहरात होणार दोन वरिष्ठ न्यायालयांची स्थापना मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये अंतिम मंजुरी
शहरात सुरू होणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या अनेक वर्षांपासून वकील आणि नागरिकांच्या मागणीला अखेर यश आले असून शहरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना व पदांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरात आता या दोन वरिष्ठ न्यायालयांची स्थापना होणार असून पिंपरी-चिंचवडकरांना पुण्याला माराव्या लागणाऱ्या चकरा कमी होणार आहेत. शहरात ही न्यायालये स्थापन व्हावीत, या करिता पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असाेसिएशन व वकिलांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता. मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये अंतिम मंजुरी मिळताच वकिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरासाठी प्रस्तावित दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मध्ये अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शहरासाठी एक अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तर एक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मंजूर करण्यात आलेले आहे. काही महिन्यांच्या कालावधीत हे नवीन न्यायालय शहराच्या सेवेत कार्यरत होणार असून, आता शहरातील नागरिकांना पुणे येथील न्यायालयात जाण्याची गरज पडणार नाही.
हे न्यायालय मंजूर करून घेण्यासाठी आज पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे, माजी सचिव ॲड. धनंजय कोकणे व सदस्य ॲड. राजेश राजपुरोहित यांच्या शिष्ठमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे त्याचबरोबर विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, सह -सचिव विलास गायकवाड यांची भेट घेत पाठपुरावा केला. या बाबतची अंतिम मंजुरी काही वेळापूर्वी मंत्रिमंडळात जाहीर करण्यात आली.
“या सुवर्णक्षणासाठी पाठपुरावा केलेले पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मे. रेवती मोहिते-डेरे, पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश मे. एम. के. महाजन,विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले मॅडम, सह -सचिव विलास गायकवाड, पिंपरी न्यायालयातील न्यायाधीश, स्थानिक सर्व आमदार व लोकप्रतिनिधी त्याचबरोबर या न्यायालयाच्या मंजुरीसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आम्ही आभार मानतो. या दोन वरिष्ठ स्तरावरील न्यायालयांच्या स्थापनेमुळे पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची कामे शहरातच होणार असून त्यांना पुण्यापर्यंत जावे लागणार नाही.”
ॲड. गौरव वाळुंज, अध्यक्ष
पिंपरी-चिंचवड ॲड. बार असोसिएशन
“शहरातच ही दोन न्यायालये असावी, यासाठी बऱ्याच दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यास यश आले असून शहरातील नागरिक, वकील आणि पोलिसांसाठी हे उपयोगी ठरणार असून या कार्यात आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही बार असोसिएशनच्या वतीने आभार मानतो.”
– ॲड. उमेश खंदारे, सचिव
पिंपरी-चिंचवड ॲड. बार असोसिएशन















