झाडांची अंत्ययात्रा! अनधिकृत झाडतोडीविरोधात ‘आप’चा अनोखा आंदोलनप्रकार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड व पुणे शहरांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या अनधिकृत झाडतोडीच्या विरोधात आम आदमी पार्टीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत जनजागृतीचा नवा संदेश दिला. शहरातील हरित पट्टा दिवसेंदिवस कमी होत असून, त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर ‘झाडांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा’ काढून आम आदमी पार्टीने प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनात शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. झाडांचे मुखवटे, फाटकी पानं, आणि शवपेटीच्या स्वरूपात झाडे घेऊन शोकसभा आणि मिरवणुकीद्वारे झाडांच्या होत असलेल्या विनाशाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला.
झाडांची अनधिकृत तोड केवळ हिरवाईचा नाश करत नाही, तर येत्या काळात पुण्यासारख्या शहराला उष्णता, कोरडी हवा आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकवू शकते. या आंदोलनाच्या माध्यमातून “हिरवाई हा हक्क आहे, तो हिरावला जाऊ देणार नाही” हा संदेश देण्यात आला.








