वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया तातडीने राबवा
रिंगरोडसह इतर महत्वाच्या प्रकल्पांचा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला आढावा

पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध यंत्रणांमार्फत उपाययोजनांवर भर दिला जात आहे. यात प्रामुख्याने प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने तातडीने मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. गुरुवारी त्यांनी औंध कार्यालयात विविध प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत तातडीने अपेक्षित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
पुणे शहरासह इतर काही भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठोस पावले उचलली जात आहेत. हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतुकीसह नागरी समस्या निकाली काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ते रुंदीकरणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यासह रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरु असून त्यासंबंधी तातडीने मोजणी करून भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश पीएमआरडीएचे महानगर आयुक्त यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले.
या बैठकीत नाशिक फाटा ते राजगुरुनगर (NH-60) या मार्गावरील एलीव्हेटेड कॉरिडॉरच्या अप्रोच रॅम्पसाठी नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, चाकण (ता. खेड) या गावातील मोजणी करून भूसंपादन प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले. यासह चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधील जमिनींचे भूसंपादन करून पर्यायी बाह्य वळण रस्ते तयार करण्याबाबत चर्चा झाली.
मुळशी तालुक्यातील बालेवाडी ते शेडगेवस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती आणि नांदे – माण यासह इतर मार्गावरील भूसंपादन प्रस्तावांचा आढावा यावेळी घेण्यात आला. नवले ब्रिज भागातून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी आणि नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, मुख्य अभियंता रिनाज पठाण, भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, सह आयुक्त हिम्मत खराडे, भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षक आशा जाधव, पुणे महानगरपालिका, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रिंग रोडच्या भूसंपादनावर चर्चा
रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यात नाशिक हायवे ते नगर रोड या दरम्यानच्या सोलू, सोलू इंटरचेंज, वडगाव शिंदे आणि निरगुडी या गावांमधील मोजणी पूर्ण झाली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात नगर हायवे ते सोलापूर हायवे या मार्गावरील आंबेगाव खुर्द आणि भिलारेवाडीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात सोलापूर रोड ते सातारा रोड आणि चौथ्या टप्प्यात सातारा ते पौड रोड या मार्गावरील भूसंपादन प्रक्रियेवर चर्चा झाली. रिंग रोडसाठी टप्प्याटप्प्याने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत असून आजपर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला.















