नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक समस्या सोडविण्यात याव्यात – विशाल काळभोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘संकल्प परिवर्तनाचा, ध्यास विकासाचा’ या विचारातून चिंचवड स्टेशन ते निगडीदरम्यान सुरू असलेल्या महामेट्रोच्या कामामुळे उद्भवणाऱ्या वाहतूक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नागरिकांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना देखील अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन काही सूचनांचे पत्र युवा नेते विशाल काळभोर यांनी तयार करून पोलिस वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील यांना प्रत्यक्ष भेटून सादर करण्यात आले. त्यांनी या सर्व सूचना सकारात्मकतेने ऐकून घेतल्या असून, लवकरच योग्य त्या पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
या पत्रात पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश होता:
वाहतूक वळविण्याची योजना: चिंचवड स्टेशनजवळील आग्रेसन भवनापासून रावेत, प्राधिकरण आणि गंगानगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दिशादर्शक फलक लावून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्याची विनंती.
सिग्नल वेळेत वाढ: आकुर्डी खंडोबा मंदिर चौकातील सिग्नलची वेळ वाढवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी.
बी.आर.टी मार्गाचा तात्पुरता वापर: आकुर्डी चौकात रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बी.आर.टी मार्ग सर्व वाहनांसाठी खुला करण्याची सूचना.
सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि भालेराव हाइटजवळील रस्त्यांवर ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रबरी स्पीड ब्रेकर बसविण्याची गरज.
जय मल्हार चौक सुधारणा: खंडोबा मंदिरासमोरील चौकात मोठ्या सर्कलचा व्यास कमी करून, सिग्नल व ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याची विनंती.
काळभोरनगर वाहतूक अडथळा: टीव्हीएस शोरुमसमोर नो-पार्किंग झोनमध्ये नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
या सूचनांमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाहतूक विभागाकडून लवकरच या बाबींची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे.








