Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह. भ. प. बाळासाहेब काशीद पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास बालवडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे होत असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भव्य मंदिराच्या निर्माण कामासाठी एक्कावन लाख रुपयांचा निधी दिला. या कार्याबद्दल पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्यावतीने बालवडकर यांचा सत्कार करण्यात आला.

वारकरी सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी, पिंपळे निलख ग्रामस्थ यांच्या वतीने जुनी सांगवीतील मारुती मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष व जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विलास बालवडकर यांचा सत्कार करण्यात आला.

गाथा चिंतन सोहळ्यात ह.भ.प. सचिन महाराज पवार यांनी निरूपण केले. यावेळी अॅड पांडुरंग थोरवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, ह.भ.प. विक्रम महाराज मोरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजाभाऊ चोपदार, गहिनीनाथ कळमक, अरुण पवार, महेश इंगवले, अशोक ढोरे पाटील, कुमार ढोरे, पारस ढोरे, बाळासाहेब शितोळे, राजेंद्र ढमाले, सौरभ शिंदे, वेदांत ढोरे, यश जाधव, सौरभ चव्हाण, तुकाराम भाऊ, राघव काटे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अरुण पवार म्हणाले, जगदगुरू संत तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर उभे राहत असून, सकल वारकरी सांप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद व पदाधिकारी स्वतः लक्ष घालीत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भंडारा डोंगरावरील हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावे, याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी, तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व लहानथोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करीत आहेत. ह. भ. प. बालवडकर यांनी केलेली ५१ लाख रुपयांची मदत मोलाची आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व विश्वस्तांचा सौरभ शिंदे आणि सांगवी ग्रामस्थ यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version