ताज्या घडामोडीपिंपरी
स्पाईन रोडवरील स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चारचाकींना बंदी; सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव यांच्या प्रयत्नांना यश!”

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -स्पाईन रोडवरील स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चार चाकी वाहनांच्या गर्दीमुळे होत असलेल्या वाहतूककोंडी, धूरप्रदूषण आणि वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे शरद नगर, घरकुल, फुलेनगर आणि शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पादचारी, शाळकरी मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हा भुयारी मार्ग धोकादायक ठरत असल्याने नागरीकांमध्ये नाराजी होती.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव यांनी वाहतूक विभागाकडे भुयारी मार्गात चार चाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्याची ठोस मागणी केली होती. अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अखेर वाहतूक विभागाने ही मागणी मान्य केली.
वाहतूक विभागाने आता स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चार चाकी वाहनांसाठी ‘नो एंट्री’ ची अंमलबजावणी केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक परिसरांमध्ये — शरद नगर, घरकुल, फुलेनगर, शिवाजी पार्क — येथे ट्रॅफिकचा ताण लक्षणीय कमी झाला आहे.
स्थानिक नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून भुयारी मार्ग आता पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव यांनी हा निर्णय तातडीने लागू करण्यात मदत केल्याबद्दल वाहतूक विभागाचे आभार मानले आहेत.
नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत, “दीर्घकाळाच्या समस्येतून मुक्तता मिळाली” अशी भावना व्यक्त केली.



















